नागपूर(nagpur) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे भेट देऊन प्रस्तावित १०,००० टन क्षमतेच्या एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पातील अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम सुविधांच्या त्रिमितीय (3D) आराखड्याची पाहणी केली.
यावेळी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वावलंबन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच भारतीय संरक्षण दलांच्या सामर्थ्यात भर घालणाऱ्या बहुनळी रॉकेट प्रक्षेपण प्रणाली ‘पिनाका’चीही पाहणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अय्यर यांनी प्रकल्पाची माहिती सादर केली. प्रस्तावित एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार असून ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागपूरमधील आयुध निर्माणी अंबाझरी हे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आणि उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रातील योगदानातही वाढ होणार आहे.
