Mumbai-राज्यातील ४ लाख शिक्षकांना गुगलकडून एआय प्रशिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव श्री. ताशीलदार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, गुगल फॉर एज्युकेशनचे वरिष्ठ अधिकारी संजय जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, प्रशिक्षणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. सुरुवातीला निवडक मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. संपूर्ण प्रशिक्षण गुगल फॉर एज्युकेशनकडून विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाणार असून प्रशिक्षण प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण राहील, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जागतिक दर्जाच्या संस्थेकडून प्रशिक्षण मिळावे, ही विभागाची अपेक्षा होती. गुगल फॉर एज्युकेशनसोबतच्या या सहकार्यामुळे लाखो शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार असून त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांनाही होणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जनजागृती निर्माण होण्यासही मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला डिजिटल युगाशी सुसंगत बनविण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण मानला जात असून शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे मोठे पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *