मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अभियान अधिक प्रभावी आणि लोकसहभागावर आधारित करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील हवामान बदलाच्या विषयाचा दरमहा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्याबाबतही आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘माझी वसुंधरा’ अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना व्यापक स्वरूपात राबविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून अभियानाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे. यामुळे पर्यावरण संरक्षण चळवळ अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि पर्यावरणविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी सोशल मीडियासारखे स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि स्वयंसेवी गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बैठकीस पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
