Kolhapur-श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १,४४५.९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १,४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. तसेच मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या प्रदक्षिणा मार्गाचे काम, परिवार देवता मंदिरांचे संवर्धन तसेच मुख्य मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंदिर विकास आराखड्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या आराखड्याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यामुळे मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव अधिक जतन केले जाणार असून भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.