Mumbai –’करा योग, राहा निरोगी!’ : मुंबईतील १,००० हून अधिक मनपा शाळांमध्ये वर्षभर योग शिक्षण कार्यक्रम

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर चालणाऱ्या योग शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबईतील १,००० हून अधिक महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत योगाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच निरोगी जीवनशैलीची सवय लागावी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही बळकट व्हावे, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होणार आहे. भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटी आणि महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य हेच समृद्ध आणि सक्षम मुंबईचे भविष्य असल्याचे सांगत नागरिकांना योग अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैली रुजविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *