पिंपरी, दि. २०(pimpri chinchwad)-‘पोलीस आयुक्तांची भेट’ आता शुक्रवारी; नागरिकांसाठी जनसंवादाचा दिवस बदलला,सोमवारची परंपरा थांबली; दर शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत आयुक्त ऐकणार नागरिकांच्या तक्रारी.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या उपक्रमाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. आता हा उपक्रम आता सोमवारऐवजी दर शुक्रवारी आयोजित केला जाणार आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. वाढता प्रतिसाद आणि प्रशासकीय कारणांमुळे उपक्रमाचा दिवस व वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांना थेट पोलीस आयुक्तांची भेट घेता येणार आहे. हा बदल २६ जून २०२६ पासून लागू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवार २२ जून रोजी ‘पोलीस आयुक्तांची भेट’ हा उपक्रम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जुन्या वेळापत्रकानुसार आयुक्तालयात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या वेळेत यापूर्वीही दोन वेळा बदल करण्यात आले होते. सुरुवातीला हा उपक्रम दर सोमवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आयोजित केला जात होता. त्यानंतर वेळ बदलून दुपारी ३ ते ५ करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा बदल करत हा उपक्रम शुक्रवारी सकाळच्या वेळेत हलविण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्व नागरिकांनी बदललेल्या दिवसाची व वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रक एका नजरेत
📌 उपक्रम : पोलीस आयुक्तांची भेट
📌 दिवस : प्रत्येक शुक्रवार
📌 वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी १.००
📌 अंमलबजावणी : २६ जून २०२६ पासून
📌 सूचना : २२ जून रोजी उपक्रम होणार नाही
