शेअर मार्केट आणि भिशीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक आहेरकर कुटुंबीय गजाआड; आर्थिक गुन्‍हे शाखेची कारवाई

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आणि भिशीमध्ये रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची पाच कोटी तीन लाख १४ हजार ३६८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी धडक कारवाई करत फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार आरोपींना अहमदनगरमधील नेवासा येथून अटक केली आहे.
रमेश पुंजा आहेरकर, छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर आणि आदित्य रमेश आहेरकर (सर्व रा. शुभारंभ रेसिडेन्सी, फ्लॅट नं. ३०२, दत्त मंदिराजवळ, माण, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. हनुमंत भागवत जाधव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आर्थिक गुन्‍हे शाखेच्‍या वरिष्‍ठ निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आहेरकर कुटुंबाने आपआपसात संगणमत करून ‘वेदांत फायनान्स सर्व्हिसेस’, ‘त्रिवेणी पुजा भांडार’ आणि ‘आदित्य इंटरप्रायझेस’ अशा वेगवेगळ्या फर्म स्थापन केल्या होत्या. या फर्मच्या माध्यमातून त्यांनी फिर्यादी हनुमंत जाधव व इतर गुंतवणूकदारांना प्रति महिना ४ ते ५ टक्के जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा न देता एकूण चार कोटी १८ लाख २० हजार ८९० रुपयांचा विश्वासघात करून आरोपींनी आर्थिक फसवणूक केली.
​गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपींनी हिंजवडी येथील आपले राहते घर बंद केले आणि स्वतःचे अस्तित्व लपवून ते फरार झाले होते. पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत या चारही आरोपींना अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील नेवासा येथून अटक केली. न्यायालयाने आरोपींना २२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या वेगवेगळ्या फर्मची व वैयक्तिक अशी एकूण ११ बँक खाती डेबिट फ्रीज केली असून, त्यांच्या मालमत्तेचा शोध सुरू आहे.
​पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *