Mumbai-“योग ही संपूर्ण जीवनशैली; प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा” – सर्बानंद सोनोवाल

मुंबई(mumbai) दि. २१ जून -भारताने जगाला दिलेले योग हे आरोग्य, संतुलन आणि मानसिक शांततेचे अनमोल वरदान आहे. योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांना निरोगी ठेवणारी संपूर्ण जीवनशैली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी आणि सकारात्मक जीवन जगावे, असे आवाहन केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत योगाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला.

यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, खासदार डॉ. निशिकांत दुबे, खासदार रवी किशन, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, अभिनेत्री ईशा देओल तसेच नीतू चंद्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेतील योग आज जगभर स्वीकारला जात असून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून मानवकल्याणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *