फेसबुक, इन्स्टाग्रामवर कृतज्ञतेचा वर्षाव; वडिलांच्या संघर्ष, त्याग आणि प्रेमाला शहरवासीयांचा सलाम
पिंपरी-चिंचवड |
जगभरात का़ल रविवारी फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातही या दिवसाला विशेष प्रतिसाद मिळाला. दिवसभर सोशल मीडियावर वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्टचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि एक्स या माध्यमांवर हजारो नागरिकांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो, व्हिडिओ आणि भावनिक संदेश शेअर केले.
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये धावपळीचे जीवन हे नित्याचे झाले आहे. नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये अनेकदा कुटुंबासाठी वेळ देणे कठीण होते. अशा परिस्थितीत वर्षभर मनात दडून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे हे एक निमित्त ठरले. अनेकांनी आपल्या आयुष्यातील प्रेरणास्थान असलेल्या वडिलांबद्दल मनोगत व्यक्त केले.
सकाळपासूनच सोशल मीडियावर फादर्स डेचे संदेश ट्रेंड होत होते. बालपणीच्या आठवणी, शाळेतील दिवस, वडिलांसोबतचे अविस्मरणीय क्षण आणि त्यांच्या कष्टमय जीवनप्रवासाच्या कथा अनेकांनी शेअर केल्या. काहींनी वडिलांच्या संघर्षावर आधारित व्हिडिओ आणि रील्स तयार केल्या. तर अनेकांनी त्यांच्या त्यागामुळेच आयुष्यात यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.
तरुणांमध्ये फादर्स डेचा विशेष उत्साह दिसून आला. अनेक युवक-युवतींनी वडील हेच आयुष्यातील पहिले शिक्षक, पहिले मार्गदर्शक आणि संकटातील खंबीर आधार असल्याच्या भावना आपल्या पोस्टमधून व्यक्त केल्या. करिअर, शिक्षण आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दुसरीकडे अनेक पालकांनीही मुलांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे आनंद व्यक्त केला. मुलांचे यश, त्यांची प्रगती आणि त्यांच्याकडून मिळणारा सन्मान हीच आयुष्यभराच्या कष्टांची खरी कमाई असल्याची भावना अनेक वडिलांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर मुलांनी केलेल्या पोस्ट पाहून अनेक पालक भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
फादर्स डेचा उत्सव केवळ डिजिटल माध्यमांपुरता मर्यादित राहिला नाही. शहरातील अनेक कुटुंबांनी एकत्र वेळ घालवला. काहींनी घरात छोटेखानी सेलिब्रेशन केले. तर काही कुटुंबांनी सहकुटुंब बाहेर जाऊन हा दिवस संस्मरणीय बनवला. मुलांनी वडिलांना भेटवस्तू दिल्या. त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केले. काहींनी विशेष कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजनही केले.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनीही फादर्स डे निमित्त उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांनी वडिलांवर आधारित लेख, कविता आणि शुभेच्छा संदेश सादर केले. अनेक ठिकाणी वडिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
तंत्रज्ञानामुळे संवादाची साधने बदलली असली तरी नात्यांमधील जिव्हाळा आणि भावनिक बंध कायम असल्याचे चित्र फादर्स डेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या हजारो भावना आणि शुभेच्छांमधून वडील-मुलांच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि आपुलकीचे अनोखे दर्शन घडले.
