पन्ना जिल्ह्यात सापडला ६.५४ कॅरेटचा हिरे; नोएडातील महिलेचे नशीब रातोरात उजळले

पन्ना

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्याच्या रत्नगर्भा भूमीने पुन्हा एकदा एका कुटुंबाचे नशीब पालटले आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका महिलेच्या खाणीतून ६.५४ कॅरेट वजनाचा मौल्यवान हिरा सापडला असून त्याची अंदाजे किंमत २० ते २५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा येथील मीणा सिंह यांच्या नावावर पन्ना जिल्ह्यातील जरुआपुर परिसरात उथळ हिऱ्याच्या खाणीचा पट्टा आहे. नेहमीप्रमाणे या खाणीत मजूर उत्खनन आणि माती चाळण्याचे काम करत होते. त्याचवेळी मातीमध्ये एक चमकदार दगड आढळून आला.

दगड स्वच्छ केल्यानंतर तो मौल्यवान हिरा असल्याचे स्पष्ट झाले. या शोधानंतर खाणीशी संबंधित कुटुंब आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिरा तज्ज्ञ आणि पारखी अनुपम सिंह यांच्या मते, सापडलेला हिरा उत्कृष्ट दर्जाचा असून त्याचे वजन ६.५४ कॅरेट आहे. त्याची जेम क्वालिटी चांगली असल्याने आगामी शासकीय लिलावात त्याला आणखी जास्त किंमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पन्ना जिल्हा हा देशातील हिऱ्यांसाठी प्रसिद्ध मानला जातो. येथे अनेकदा सामान्य कुटुंबांना मौल्यवान हिरे सापडून त्यांचे नशीब बदलल्याच्या घटना समोर येत असतात. या नव्या शोधामुळे पुन्हा एकदा पन्ना जिल्ह्याची ओळख चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *