Mumbai-राज्याच्या एआय मॉडेलचे लोकार्पण; शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई(mumbai) : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत असून, राज्याच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानभवन येथे महासारथी, महाडीबीटी २.०, सेवा केंद्रांचे मानकीकरण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि राज्याच्या एआय मॉडेलचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नव्या डिजिटल उपक्रमांमुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभतेने आणि पारदर्शकपणे उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

कार्यक्रमादरम्यान शासकीय सेवांचे लाभार्थी मधुकर मोरे आणि वत्सला पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते डिजिटल हयातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित सेवांच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्य शासनाच्या या उपक्रमांमुळे ई-गव्हर्नन्सला चालना मिळणार असून, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *