मुंबई(mumbai) : मुंबई मंडळ संसद सदस्य समितीची बैठक २५ जून २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रलंबित विकासकामे आणि प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना विविध विषयांवर जाब विचारत महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.
बैठकीत ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासह अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. ठाणे स्टेशनचा पुनर्विकास प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असून त्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून त्यावरील पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.
दररोज सुमारे ७ ते ८ लाख प्रवासी ठाणे स्थानकावरून प्रवास करत असल्याने स्वच्छता, शौचालये, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पादचारी पूल (एफओबी), व्हर्टिकल गार्डनिंगसह विविध प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे स्थानकावर अतिरिक्त एस्कलेटर आणि लिफ्टची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर दोन एस्कलेटर आणि एका लिफ्टचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, आसनगाव आणि टिटवाळा मार्गांवरील रेल्वे सेवा वाढविण्याबाबत चर्चा झाली. कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल लोकलच्या फेऱ्या वाढविणे, मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरू ठेवणे, तसेच पनवेल आणि ठाणे स्थानकांवर दुरंतो एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली. सीवूड-उरण मार्गावरील रेल्वे फेऱ्या वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी तसेच वेलंकणी यात्रेसाठी जुलै महिन्यात विशेष रेल्वे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यकतेनुसार विशेष गाड्या चालविण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत दिघा येथील मोगली धरणाचे हस्तांतरण करून स्थानिक नागरिकांच्या पाणीप्रश्नाचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ऐरोली लिंक रोडच्या कामांना गती देणे आणि कोविड काळापासून बंद असलेली ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरू करण्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.
या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीरंग बारणे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शिरीष मीना तसेच रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
