पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दुसऱ्या पतीच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी जुन्या वादावरून एका महिलेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच मटण दुकानावरील कोयत्याने कपाळावर वार करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास गोकुळ हॉटेल समोर, पिंपरी येथे घडली.
शारदा लखमीचंद भुंबक (वय ३७, रा. काळेवाडी-पिंपरी रोड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनम सचिन परदेशी (वय ३५), दीपमाला प्रितम परदेशी (वय ४५), प्रितम बन्सीलाल परदेशी (वय ४६) आणि राजेश सचिन परदेशी (वय १८, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनम परदेशी हिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा दुसरा नवरा सचिन परदेशी याची पहिली पत्नी सोनम आणि तिच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना गाठून शिवीगाळ केली व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीदरम्यान सोनम हिने तिच्या मटण दुकानातील कोयत्याने फिर्यादी यांच्या कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
जुन्या वादातून महिलेवर कोयत्याने वार
