पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – आपल्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली, या कारणावरून मोठ्या भावाने आणि कुटुंबियांनी मिळून एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व चाकूने डोक्यात वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. २७ जून) दुपारी १२ वाजताच्या सुमारास लिंक रोड पत्रा शेड, चिंचवड येथे घडली.
आकाश बबन साळवे (वय ३०, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक बबन साळवे (वय ४०), प्रकाश बबन साळवे (वय ३४), शारदा बबन साळवे (वय ६५) आणि बबन साळवे (वय ७०, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामावर असताना घरी वाद सुरू असल्याने त्यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले होते. मात्र आरोपी त्यांच्या अंगावर धावून आल्याने फिर्यादींनी पोलिसात तक्रार केली. याचाच राग धरून आरोपींनी फिर्यादीला गाठून “आमचे विरोधात तक्रार देतो काय” असे म्हणत मारहाण सुरू केली. यावेळी मोठ्या भावाने शेजारच्या घरातील चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर आणि कानाच्या मागे वार केले, तसेच नाकावर मारहाण केली. फिर्यादीची पत्नी भांडण सोडवायला आली असता लहान भावाने तिलाही ढकलून दिले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने भावावर चाकूहल्ला
