राम मंदिर ट्रस्टच्या निर्णयांपासून विहिंपने झटकले हात; ‘आमची भूमिका संपली’, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे स्पष्ट विधान

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रस्टने अलीकडे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी विश्व हिंदू परिषद स्वीकारत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आलोक कुमार म्हणाले, “रामजन्मभूमी आंदोलनात विश्व हिंदू परिषदेची भूमिका अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यापुरती होती. मंदिर उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आमची भूमिका तेथे संपली आहे.”

ते पुढे म्हणाले की, देशभरात मंदिरे बांधणे किंवा त्यांचे व्यवस्थापन करणे हे विश्व हिंदू परिषदेचे काम नाही. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये घेतले जाणारे निर्णय आणि त्यासंबंधित घडामोडींसाठी ट्रस्टच पूर्णपणे जबाबदार आहे.

अयोध्येतील प्रकरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) किंवा केंद्र सरकारवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, “चंपत राय यांच्या सरचिटणीस या नात्याने घेतल्या जाणाऱ्या निर्णयांशी विश्व हिंदू परिषदेचा कोणताही संबंध नाही. त्या भूमिकेपासून मी विहिंपला पूर्णपणे अलिप्त करत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अयोध्येतील अलीकडील घडामोडी आणि राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलोक कुमार यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले असून, यामुळे नव्या राजकीय आणि सामाजिक चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *