‘एफडीए’चा धाक वाढला! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांच्या मेन्यूमधून पनीर-चीजचे पदार्थ गायब

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा परिणाम; ‘अॅनालॉग चीज वापरत नाही’ असे फलक झळकू लागले, भेसळखोरांमध्ये खळबळ

पिंपरी-चिंचवड :
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. कारवाईच्या भीतीने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या मेन्यू कार्डमधून पनीर, चीज आणि खव्यापासून बनणारे पदार्थ कमी केले आहेत. काही ठिकाणी तर ‘आम्ही अॅनालॉग चीज किंवा कृत्रिम पनीर वापरत नाही’ असे फलकही लावण्यात आले आहेत.

महागाई आणि वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे अनेक हॉटेल्स स्वस्त दरातील अॅनालॉग चीज आणि कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांचा वापर करत असल्याची चर्चा होती. मात्र, एफडीएच्या वाढत्या तपासण्या आणि कारवाईमुळे अशा पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनीही सावध भूमिका घेतली आहे. काही विक्रेत्यांनी व्यवसाय तात्पुरता बंद केल्याची माहिती व्यावसायिकांकडून दिली जात आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम किंवा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सातत्याने सेवन केल्यास पचनसंस्था, यकृत आणि एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भेसळयुक्त अन्नाविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी भेसळीची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफडीएने दिला.

एफडीएच्या या मोहिमेमुळे शहरातील हॉटेल व्यवसायात शुद्ध अन्नपदार्थ वापरण्याबाबत जागरूकता वाढली असून, ग्राहकांमध्येही सुरक्षित आणि दर्जेदार अन्नाची अपेक्षा अधिक बळावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *