पोलिसांनी लावली अडीच कोटींच्‍या अंमली पदार्थांची विल्‍हेवाट १५६ गुन्ह्यांतील गांजा, एमडी, ब्राऊन शुगर, अफूची झाडे आणि डोडाचा समावेश

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ नष्ट केले. शहरातील १५६ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा साठा रांजणगाव एमआयडीसी येथील अधिकृत औद्योगिक भट्टीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईत ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर, १२ किलो अफूची झाडे आणि १०९ किलो डोडा यांचा समावेश होता. न्यायालयीन प्रक्रिया आणि शासनाच्या नियमांची पूर्तता केल्यानंतर या अमली पदार्थांची अंतिम विल्हेवाट लावण्यात आली.
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस fc उपआयुक्त रोहिदास पवार, उपआयुक्त संदीप आटोळे यांच्या उपस्थितीत रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या भट्टीत अमली पदार्थ जाळण्यात आले. यावेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *