अश्लील हावभाव नव्हे, तर ‘हे’ होते कारण? सिया गोयलच्या बचावासाठी वडील आले समोर

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिने पोलिसांसोबत असताना माध्यमांसमोर मधले बोट दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात तीव्र चर्चा रंगली होती. या कृतीवरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, आता सियाच्या वडिलांनी मुलीच्या बचावासाठी पुढे येत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

केतन अग्रवालचा विश्वासघाताने खून केल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. पोलिसांच्या तपासानुसार, दोघांनी मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप असून या प्रकरणात अनेक धक्कादायक डिजिटल पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी सियाला तिच्या घरी नेऊन काही कपडे आणि दुसरा मोबाईल जप्त केला. या कारवाईदरम्यान माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. त्याचवेळी सियाने कॅमेऱ्यासमोर मधले बोट दाखवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हावभावाचा अर्थ अश्लील असल्याचे मानत अनेकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, या वादावर आता सियाच्या वडिलांनी प्रतिक्रिया देत मुलीचा अश्लील हावभाव करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, सियाने माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दर्शवण्यासाठी किंवा ‘एक मिनिट थांबा’ असा संकेत देण्यासाठी ते बोट दाखवले होते. तिच्या कृतीचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मात्र, सियाच्या वडिलांच्या या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावर या मुद्द्यावर मतमतांतरे कायम आहेत. काहींनी त्यांच्या दाव्याला समर्थन दिले, तर अनेकांनी मधले बोट दाखवणे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद हावभाव मानला जात असल्याचे सांगत स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस विविध डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत. या बहुचर्चित प्रकरणातील प्रत्येक घडामोडीकडे राज्यासह देशभराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *