pandharpur-आषाढी वारीत प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा; आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना तातडीचे उपचार मिळणार
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गंभीर आजारी किंवा अपघातग्रस्त वारकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवता येणार आहे.
वारीदरम्यान कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीला त्वरित प्रतिसाद देता यावा, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णवाहिका, अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका, औषधसाठा, अतिदक्षता सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे लाखो वारकरी भाविकांना अधिक सुरक्षित आणि वेळेत आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असून, यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.