पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ५१ अधिकारी, साडेतीन हजारांहून अधिक अंमलदार, एसआरपीएफ तुकड्या तैनात

पिंपरी : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक व अभेद्य बंदोबस्ताची तयारी केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे नियोजन केले असून, विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान करून आकुर्डी मार्गे निगडीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. त्यानंतर ८ जुलै रोजी पालखी पिंपरी, महादेव चौक, मोरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एच. ए. कॉलनी मार्गे पुण्याकडे रवाना होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान करून दिघीमार्गे विश्रांतवाडीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

या सोहळ्यासाठी लाखो वारकरी सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त तगडा ठेवलला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत ५ पोलिस उपायुक्त, १२ सहायक पोलिस आयुक्त, ५२ पोलिस निरीक्षक, ३७० सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, १,१११ अंमलदार, ४३५ वाहतूक कर्मचारी, एसआरपीएफच्या ४ कंपन्या, बीडीडीएस, होमगार्ड, आरसीपीच्या 5 तुकड्या, ‘स्टार्किंग फोर्स’चे 14 पथके तसेच २४ ड्रोन कॅमेऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय गर्दीच्या ठिकाणी विशेष नजर ठेवण्यात येणार असून वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *