महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण आणि सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री वापरत असलेली भाषा आणि सत्ताधारी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात ‘बघून घेऊ’. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ही कुठली भाषा आहे? सत्तेवर बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही.” राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने संयम, सभ्यता आणि जबाबदारीची जाणीव ठेवूनच वक्तव्य करायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या वादग्रस्त वक्तव्यांचाही समाचार घेतला. “कुणी खासदार म्हणतो, ‘मी बॉम्ब टाकीन… पाच मर्डर केलेत.’ अशी भाषा बोलण्याची हिंमत त्यांना कशी होते? कारण त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही,” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी राज्यात कायद्याचा धाक कमी झाल्याची टीका करत सत्ताधाऱ्यांनी आपल्या नेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली. लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची आक्रमक आणि धमकीची भाषा वापरली जात असेल, तर त्याचा समाजावर चुकीचा परिणाम होतो, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, त्यांच्या टीकेला महायुतीतील नेते कोणते प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
