मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महायुतीत सहभागी होणार, भाजपशी हातमिळवणी करणार किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या सर्व अटकळींवर अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया देत म्हटले, आम्हाला काँग्रेसमध्ये पाठवलं, भाजपमध्ये पाठवलं, शिवसेनेत पाठवलं आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील भेटीनंतर. त्यानंतर पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीची चर्चा रंगली. या भेटींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
याशिवाय, पक्षातील काही आमदार पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत साशंक असल्याच्या चर्चांमुळेही या अफवांना अधिक बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
सुप्रिया सुळे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, आमच्याशी कोणीही कोणत्याही प्रकारची चर्चा करत नाही आणि आम्हीही कोणाशी चर्चा करत नाही. भाजपसोबत जाण्याचा किंवा कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा प्रश्न आमच्या चर्चेतही आलेला नाही.
त्या पुढे म्हणाल्या, या सर्व बातम्या केवळ वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांपुरत्याच मर्यादित आहेत. प्रत्यक्षात अशा कोणत्याही राजकीय हालचाली सुरू नाहीत.
सुप्रिया सुळे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आगामी काळात महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे सर्वांचे लक्ष कायम राहणार आहे.
