नागपूर | प्रतिनिधी
नागपूरच्या दाभा परिसरात उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कृषी कन्व्हेन्शन आणि प्रदर्शन केंद्राच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे केंद्र केवळ कृषी प्रदर्शनापुरते मर्यादित राहणार नाही, तर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यावसायिक परिषद, उद्योग मेळावे आणि इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून विकसित होईल. त्यामुळे नागपूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दाभा गावालगत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २१.७ हेक्टर जागेवर राज्य शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही वेगाने सुरू आहे.
यावेळी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, खासदार मायाताई इवनाते तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
