प्रतिनिधी | पंढरपूर
आषाढी वारी म्हणजे केवळ विठ्ठलनामाचा गजर नव्हे, तर निःस्वार्थ सेवेची परंपराही आहे. या परंपरेला जपत धाराशिव जिल्ह्यातील विष्णू खंडागळे गेल्या १६ वर्षांपासून देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांचे विनामूल्य किंवा मिळेल त्या मोबदल्यात केस कर्तन करून अनोखी सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ होत असून, भाविकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
वारीदरम्यान अनेक वारकरी दीर्घ पायी प्रवास करतात. अशा वेळी केस कापण्यासाठी वेगळा वेळ काढणे किंवा खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही. ही गरज ओळखून विष्णू खंडागळे पालखी मार्गावरच आपले साहित्य घेऊन वारकऱ्यांना सेवा देतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल भाविकांकडून ते कोणतेही पैसे घेत नाहीत, तर काही जण स्वखुशीने जेवढा मोबदला देतात तो स्वीकारतात.
विष्णू खंडागळे यांच्यासाठी ही केवळ व्यवसायाची गोष्ट नसून विठ्ठलाची सेवा आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहणे हीच आपल्या कार्याची खरी कमाई असल्याची भावना ते व्यक्त करतात. गेली सोळा वर्षे अखंड सुरू असलेल्या त्यांच्या या सेवेमुळे वारीतील निःस्वार्थ सेवेची परंपरा अधिक समृद्ध होत असून, अनेकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
आषाढी वारीत वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, अन्नदान यांसारख्या सेवांसोबत विष्णू खंडागळे यांची ही अनोखी सेवा वारकरी संप्रदायातील मानवतेचा आणि समर्पणाचा सुंदर आदर्श म्हणून पाहिली जात आहे.
