पिंपरी चिंचवड : पिंपरीगाव येथील म्हाडा टॉवरसमोरील पिंपळे सौदागर–पिंपरीगाव मुख्य मार्गावरील एक मोठे झाड सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभे आहे. नुकत्याच आलेल्या पवना नदीच्या पुराचे पाणी झाडाच्या भोवताली साचल्याने मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून झाडाच्या मुळ्या पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे हे झाड कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
दररोज हजारो वाहने आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या या मार्गावर झाडाची ही अवस्था गंभीर अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. जोरदार वारा किंवा पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास झाड रस्त्यावर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने या झाडाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, झाड सुरक्षित करण्यासाठी आधार द्यावा किंवा आवश्यक असल्यास धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी केली आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्याऐवजी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संभाव्य अपघात टाळावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
