मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण न करणे, योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे आणि उत्पन्नाची निर्धारित मर्यादा ओलांडणे या प्रमुख कारणांमुळे लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. या प्रक्रियेनंतर योजनेतील मूळ लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 38 टक्क्यांनी घट झाली आहे.
यामध्ये सर्वाधिक लाभार्थी बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. त्यानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा अपात्र ठरलेल्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.
दरम्यान, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांनीही या योजनेच्या वाढत्या आर्थिक भाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे मोठा ताण येत असल्याचा इशारा देत, भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी काळजी घेण्याची आवश्यकता CAG ने अधोरेखित केली आहे.
राज्य सरकारकडून पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
