महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) “लालपरी” ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून ग्रामीण व दुर्गम भागातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची खरी जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लालपरी” ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानवाहिनी आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्यासाठी एसटी महामंडळ अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे प्रवास पास, शाळा व महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
