पिंपरी-चिंचवड:
मोशी येथील कचरा डेपोच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कचऱ्याच्या डेपोचा (एसएलएफ) काही भाग इमारत आणि शेजारील रस्त्यावर ढासळला. या दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कंपनीच्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियारम शरण गुप्ता (वय ५९, रा. मोशी, मूळ रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ रा. जि. बुलढाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ या कंपनीला दिले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कचऱ्याच्या डोंगराला (एसएलएफ) धोका पोहोचू नये, यासाठी त्याची तपासणी करणे आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करणे ही या कंपनीची आणि त्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी होती. उपाययोजना न केल्यास मानवी जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरक्षिततेचा अभाव असल्यामुळे कचऱ्याचा मोठा भाग अचानक ढासळला. तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर हा ढिगारा पडल्याने ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
दुर्घटनेतील मयत व्यक्तीची नावे:
१) भावेश मोहन वाणी (वय ३३)
२) अक्षय राजू सावंत (वय ३२)
३) नागेश सर्जेराव गायकवाड (वय २७)
४) सुनिल भारत कोरके (वय ३६)
५) महेश सुरेश कुंभार (वय ३२)
६) सनी अशोक माने (वय ३६)
७) राहुल धोडीबा गायकवाड (वय ३७)
८) रणजीत जयवंत पाटील (वय २२)
९) वामन दगडु कसबे (वय ५४)
जखमींची नावे:
अशोककुमार गुप्ता (वय ५९), मुनेंद्र कुमार सिंग (वय ३६), चंद्रशेखर सिंग (वय ४०), दादासाहेब आरडे (वय ४६), सोमनाथ शेळके (वय ४०), रनवीर सिंग (वय ४९), रामप्रताप चव्हाण (वय ३६), सचिन दबडगांव (वय ३२), सुजाता शिंदे (वय ४७), विजय सपकाळ (वय ३८), महेश राऊत (वय ३९), भूषण पाटील (वय २४).
महापालिकेकडून अधिकृत तक्रार
या संपूर्ण निष्काळजीपणाबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधी सोहन मधुकर निकम (वय ५५, रा. निगडी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध), १२५(ए), १२५(बी) (जीवितास धोका निर्माण करणे) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
