Mumbai-तुकाराम मुंढेंची रक्तकेंद्रांवर धडक कारवाई; २१ रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित, दोन कायमचे रद्द

मुंबई : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. मेडिकल स्टोअर्स आणि दूधभेसळ प्रकरणांनंतर आता रक्तपेढ्यांमधील अनियमिततेवर एफडीएने धडक मोहीम राबवत गेल्या तीन महिन्यांत २३ रक्तकेंद्रे आणि १५ रक्त साठवणूक केंद्रांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान विविध नियमांचे उल्लंघन, कार्यपद्धतीतील त्रुटी आणि आवश्यक मानकांचे पालन न केल्याचे आढळून आल्यानंतर एफडीएने २१ रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच गंभीर अनियमितता आढळलेल्या दोन रक्तकेंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

एफडीएने रक्तसंकलन, साठवणूक, तपासणी आणि वितरण प्रक्रियेमध्ये सुरक्षितता व गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित केंद्रांना दिले आहेत. रक्तदात्यांचे तसेच रुग्णांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात औषधे, दूध, अन्नपदार्थ आणि आरोग्यसेवांशी संबंधित क्षेत्रांमध्ये सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *