Pune-पुण्यात ६५ ठिकाणी एनआयएची धाड; पाकिस्तानशी संबंधित शहाजान भट्टीच्या नेटवर्कचा तपास, अनेक जण ताब्यात, पुण्यात ATS ची 35 ठिकाणी छापमारी

पुणे, दि. १४ जुलै : पाकिस्तानशी संबंधित गँगस्टर शहाजान भट्टी याच्या संशयित नेटवर्कचा तपास करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि स्थानिक पोलिसांनी पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी मोठी कारवाई केली. शिक्रापूर, येरवडा, पिंपरी-चिंचवडसह विविध भागांतील ६५ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. जप्त केलेल्या साहित्याची तपासणी सुरू असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहाजान भट्टीशी संबंधित आर्थिक व्यवहार, सोशल मीडियावरील संपर्क तसेच इतर संशयित नेटवर्कच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणात नेमके किती जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
या मोठ्या कारवाईमुळे पुणे शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून पुढील काही तासांत तपास यंत्रणांकडून अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *