Pimpri-Chinchwad-डेंग्यू, मलेरियाविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम ​स्वच्छता, प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड ः
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून संपूर्ण शहरभर स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रणाची व्यापक मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

​डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘ड्राय डे’ पाळा!
पावसाळ्यात साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरावे आणि अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

​डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खालील गोष्टींची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे:
पाण्याच्या टाक्या, कुलर आणि फुलदाण्या नियमित स्वच्छ कराव्यात.
​परिसरातील जुने टायर, रिकाम्या बाटल्या किंवा इतर वस्तूमध्‍ये पाणी साचू देऊ नये.
​नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा आपल्या घरात ‘ड्राय डे’ पाळावा
पाणी साचणाऱ्या जागांची तपासणी करावी.

महापालिकेचे ऑन-फील्ड नियोजन
फवारणी व फॉगिंग: डासांचा नायनाट करण्यासाठी शहरभर नियमित अळीनाशक औषधांची फवारणी आणि धूर फवारणी (फॉगिंग) केली जात आहे.
घरोघरी सर्वेक्षण: महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेत असून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.
वैद्यकीय सज्जता: महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व उपचारांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

​”पावसाळी आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांचे सक्रिय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता, विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड

​”पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. घर आणि परिसरात पाणी साचू न देणे व डासांची उत्पत्ती रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी जागरूक राहून महापालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पीसीएमसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *