विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी जादा फेऱ्या; पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
पिंपरी-चिंचवड – उन्हाळी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र दिन आणि शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या लागून आले आहेत. या
सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातून जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी तातडीने बसेस सोडल्या जातील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
तसेच, ऑनलाइन आरक्षण आणि तिकीट खिडक्यांची सुविधा वाढवण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
एसटी प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. गर्दी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे.
दहा टक्के भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
उन्हाळी हंगामात एसटीने सुमारे दहा टक्के भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जादा बसफेऱ्यांमुळे सोय झाली असली तरी वाढीव भाड्यामुळे खर्च वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही प्रवाशांनी सांगितले की, सुट्ट्यांमध्ये आधीच खर्च वाढतो. त्यात भाडेवाढीमुळे प्रवास महाग झाला आहे. त्यामुळे एसटीने भाडेवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.
