Pimpri-Chinchwad-दिघीत कोणतीही हायटेक ‘एमडी’ लॅब नाही; केंद्रीय अमली पदार्थ विभागाचा खुलासा ​फेब्रुवारीतील गुन्ह्याचा तपास करताना पुण्यातून फक्त उपकरणे जप्त

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दिघी-भोसरी परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची हायटेक प्रयोगशाळा उघडकीस आल्याचे काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, केंद्रीय अमली पदार्थ विभागाने या वृत्ताचे पूर्णपणे खंडन केले आहे. पुण्यात प्रत्यक्ष ‘एमडी’चे कोणतेही उत्पादन सुरू नसल्याचे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
​केंद्रीय अमली पदार्थ विभागाने ‘ऑपरेशन वज्र’ अंतर्गत फेब्रुवारी २०२६ मध्ये मंदसौर (मध्य प्रदेश) येथे एका गुन्ह्यात ८.१७ किलो मेफेड्रोन जप्त केले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास करताना मध्य प्रदेशातील ‘महु’ येथे छापा टाकून एका एमडी उत्पादन लॅबमधून ४३.८२ किलो मेफेड्रोन आणि २६१.३२ किलो पूर्व रसायने जप्त करण्यात आली होती.
​या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजस्थानमधील असल्याचे समोर आले. तो जोधपूर येथे एमडीची प्रयोगशाळा चालवत होता. याच मुख्य सूत्रधाराने एमडी उत्पादनासाठी लागणारी काही उपकरणे पुण्यातील दिघी परिसरामध्ये राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आणून ठेवली होती. ​या माहितीच्या आधारे ‘सीबीएन’ ने जोधपूर आणि पुणे येथे एकाच वेळी छापे टाकले. दिघी येथील संबंधित ठिकाणाहून सीलबंद खोक्यांमध्ये ठेवलेली उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
पुण्यातील ज्या नातेवाईकाच्या घरात ही उपकरणे ठेवली होती, त्यांना या उपकरणांचा मूळ उद्देश किंवा वापर माहीत नव्हता. त्यामुळे पुण्यात या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच दिघीत कोणतीही हायटेक किंवा कार्यरत प्रयोगशाळा आढळून आलेली नाही.

​गैरसमज पसरवू नका: ’सीबीएन’चे आवाहन
​मुख्य आरोपीने केवळ उपकरणे पुण्यात आणून साठवून ठेवली होती, ती जप्त करण्यात आली आहेत. पुण्यात एमडीचे उत्पादन सुरू असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे ’त्‍या’ प्रसारमाध्यमांनीआणि नागरिकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी व कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन केंद्रीय अमली पदार्थ विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *