Pimpri-Chinchwad-विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय!; पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास महापालिका सभेची मंजुरी; १५ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू, ३० जून २०२७ पर्यंत मिळणार लाभ

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पीएमपीएमएलच्या मोफत बसपास योजनेला मंजुरी दिली आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसपास पूर्णपणे मोफत मिळणार असून, शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना नियमानुसार सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महापालिका व शासनमान्य खासगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आणि घर ते शाळा हे अंतर किमान दोन किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसपास पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. तर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी बसपासच्या एकूण शुल्कापैकी २५ टक्के रक्कम पीएमपीएमएलच्या अधिकृत डेपोमध्ये चलनाद्वारे भरून अर्जासोबत सादर करावी लागणार आहे.

योजनेसाठी १५ ते ३१ जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बसपासचे वितरण होईल. हा बसपास ३० जून २०२७ पर्यंत वैध राहणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांनी अर्जासोबत रहिवासी पुरावा, आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा, शाळेचे प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे. महापालिकेने सर्व मुख्याध्यापकांना पात्र विद्यार्थ्यांची यादी वेळेत सादर करण्याचे निर्देश दिले असून, पालकांनीही मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *