लोणावळा-मावळ पर्यटकांसाठी मोठा दिलासा!; पर्यटनस्थळांवरील कलम १६३ हटले, विकेंड पर्यटनाला पुन्हा वेग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुशी धरण, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगडसह पर्यटनस्थळे पुन्हा खुली

मावळ :
लोणावळा आणि मावळ परिसरात फिरण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ अंतर्गत कलम १६३ चा प्रतिबंधात्मक आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांना पुन्हा मुक्तपणे भेट देता येणार आहे.

मुसळधार पाऊस, संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ६ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू केले होते. मात्र, हवामानात सुधारणा झाल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्याचा आढावा घेत हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, कार्ला व भाजे लेणी, श्री एकवीरा देवी मंदिर तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ल्यांवरील निर्बंध हटले आहेत. त्यामुळे आगामी शनिवार-रविवारपासून लोणावळा आणि मावळमध्ये पर्यटकांची पुन्हा मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, निर्बंध हटवले असले तरी धबधबे, किल्ले आणि धरण परिसरात खबरदारी बाळगावी, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

पर्यटनस्थळे पुन्हा खुली झाल्याने स्थानिक हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, खाद्यव्यवसाय आणि पर्यटनाशी निगडित उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, पावसाळी पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *