मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसणार असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून राज्यभर लागू होणार आहे. दरम्यान, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बससेवेवरील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचा वाढलेला खर्च, टायर, देखभाल खर्च तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ यांचा सर्वंकष विचार करून राज्य परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी आणि राज्यातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी नमूद केले.
एसटी ही राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही दरवाढ महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटी सेवेला सहकार्य करत आपला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले.
