पिंपरी-चिंचवड :
मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण वेगाने भरत असून धरणातील पाणीसाठा ९२.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही क्षणी पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
गेल्या २४ तासांत धरण परिसरात ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार ८१४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून अवघ्या २४ तासांत साठ्यात ६.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्यात एकूण ७५.४७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात ७७.८० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा धरण लवकर भरल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आगामी वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असली, तरी अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भागांसाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. धरणाची पाणीपातळी आणखी वाढल्यास सुरक्षिततेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि पर्यटकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे धरण प्रशासनाने आवाहन केले आहे.
सततच्या पावसामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
