मतदार यादीत नाव हवे?; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील पात्र नागरिकांनी बीएलओकडे अर्ज जमा करावेत; १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ मोहिमेला गती दिली आहे. या मोहिमेंतर्गत सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करत आहेत. वेळेत अर्ज सादर करणाऱ्या पात्र नागरिकांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी गणना अर्ज वेळेत भरावा. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नावाची खात्री करून आवश्यक असल्यास दावे किंवा हरकती निश्चित मुदतीत सादर कराव्यात.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन केले. उपआयुक्त सचिन पवार यांनी मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून आवश्यक दुरुस्तीसाठी विहित नमुन्यांद्वारे अर्ज करण्याचे आवाहन केले.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ आणि चुकीच्या किंवा अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ सादर करता येणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापालिकेने शहरातील सर्व पात्र नागरिकांना विलंब न करता ८ ऑगस्टपूर्वी गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.