आरएमसी मिक्सर वाहनांना दिलासा; वाहतूक प्रवेशबंदीत अंशतः शिथिलता २९ जुलैपासून महिनाभर प्रायोगिक अंमलबजावणी; सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
पिंपरी-चिंचवड :
शहरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत पोलीस वाहतूक शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रवेशबंदीच्या वेळेत अंशतः शिथिलता देण्यात आली असून, हा निर्णय २९ जुलै २०२६ पासून एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येणार आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि बांधकाम क्षेत्रालाही दिलासा देणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे. मात्र, सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवेशबंदी कायम राहणार आहे.
शनिवार आणि रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवेशबंदी लागू राहील. उर्वरित वेळेत आरएमसी वाहनांना शहरात वाहतूक करण्याची परवानगी असेल.
वाहतूक शाखेने या सवलतीसोबत काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. प्रत्येक आरएमसी वाहनावर ३६० अंश कॅमेरा बसविणे किंवा क्लिनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच प्लांटमधून वाहन बाहेर पडण्यापूर्वी चालकाची डी.डी. मशीनद्वारे तपासणी करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, डंपर, हायवा, ट्रक आणि इतर जड वाहनांसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नसून, त्यांच्यासाठी पूर्वीचेच वाहतूक नियम लागू राहणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे शहरातील बांधकाम प्रकल्पांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस वाहतूक शाखेने केले आहे.