गायीला गुंगीचे इंजेक्शन, कारमध्ये टाकून पलायन; पिंपरी पोलिसांनी उलगडले ‘कुर्ला कनेक्शन’ वैभवनगरातील गाय चोरीचा तपास वेगात; सीसीटीव्हीच्या आधारे संशयित ताब्यात, आंतरजिल्हा टोळीवर पोलिसांची नजर
पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरात घडलेल्या गाय चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत महत्त्वाचा धागा उलगडला आहे. गायीला गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि कारमध्ये टाकून पसार झालेल्या टोळीचे थेट मुंबईतील कुर्ला कनेक्शन समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यामागे आंतरजिल्हा स्तरावर कार्यरत सराईत टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पिंपरीगावातील अभिजित ज्ञानेश्वर शिंदे (वय ३७) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२७ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास वैभवनगर परिसरातील एका गोठ्याबाहेर बांधलेल्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गायीवर चोरट्यांनी डोळा ठेवला. सुमारे २० हजार रुपये किमतीच्या या गायीची चोरी करण्यासाठी आरोपी पूर्ण तयारीनिशी आले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारुती सुझुकी रिट्झ कारमधून तीन जण उतरल्याचे स्पष्ट दिसून आले. आरोपींनी प्रथम गायीला गुंगीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजले. काही वेळातच गाय बेशुद्ध पडताच तिला कारमध्ये टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्हीमधील वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संबंधित कार मुंबईतील कुर्ला परिसरात नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी मुंबई पोलिसांशी समन्वय साधत कारचा शोध घेतला. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या मते, आरोपींनी गुंगीच्या औषधांचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली आहे. त्यामुळे ही टोळी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे करत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्येही या टोळीने जनावरे चोरल्याची शक्यता तपासली जात आहे.
चोरीस गेलेल्या गायीचा शोध सुरू असून, फरार आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.