देहू-आळंदी :
आषाढी वारीचे दिवस जवळ येताच देहू आणि आळंदी या संतभूमीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थानाचे वेध संपूर्ण वारकरी संप्रदायाला लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहू आणि आळंदीकडे दाखल होत असून, दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक दिंडीमध्ये नियोजनाची लगबग सुरू आहे. मुक्काम, भोजन, वाहतूक आणि शिस्तीचे नियोजन पूर्ण केले जात आहे. वारकऱ्यांच्या निवासासाठी तंबू करण्यात आले आहेत. जुन्या तंबूंची दुरुस्तीही पूर्ण झाली आहे. पावसाळ्याचा विचार करून आवश्यक साहित्याचीही तयारी करण्यात आली आहे.
वारीतील टाळ, पखवाज, वीणा आणि मृदुंग यांना नवा साज चढविण्याचे काम सुरू आहे. पखवाजांच्या पुड्या बदलणे, शाई लावणे आणि टाळांची दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांकडे मोठी गर्दी होत आहे.
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंड्या सज्ज होत असून, वारकऱ्यांमध्ये विठ्ठल दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे.
यंदाही लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. पालखी मार्गावरील विविध यंत्रणांनीही तयारी पूर्ण केली असून, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देहू आणि आळंदी नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
