Delhi-मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरची दाणादाण; दिल्ली-जयपूर महामार्गाचा रस्ता खचला, 10 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

नवी दिल्ली : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने दिल्ली-एनसीआर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे NH-48 सह अनेक प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सर्वाधिक गंभीर परिस्थिती दिल्ली-जयपूर महामार्गावरील नरसिंहपूर परिसरात निर्माण झाली. येथे मुसळधार पावसानंतर रस्त्याचा मोठा भाग अचानक खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक नियंत्रित केली असून, त्यामुळे IFFCO चौक ते नरसिंहपूर दरम्यान सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

दीर्घकाळ वाहतूक खोळंबल्यामुळे हजारो वाहनचालकांना तासन्‌तास महामार्गावर अडकून राहावे लागले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनांचा वेग अत्यंत मंदावला, तर काही वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटनाही समोर आल्या.

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा आणि वाहतुकीसंदर्भातील अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील नागरी सुविधा आणि पावसाळी व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *