संस्थानच्या प्रलंबित मागण्यांवर शासन स्तरावर निर्णयाचे आश्वासन; १२ वर्षांपासून रखडलेला मंदिर दर्शनबारी प्रकल्पही मार्गी लावणार
आळंदी :
श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सकारात्मक असून, संस्थानच्या प्रलंबित मागण्यांवर संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शनबारी प्रकल्पही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. माउलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत सविस्तर बैठक झाली. बैठकीत संस्थानच्या विकासासाठी आवश्यक असलेले विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, पायाभूत विकासकामे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मांडण्यात आले. संस्थानच्या वतीने यासंदर्भातील सविस्तर निवेदनही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
निवेदनातील सर्व मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जाईल. संबंधित विभागांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या दर्शनबारीचा विषय गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे श्रीक्षेत्र आळंदीतील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, वारकरी संप्रदाय आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
