पालघरच्या पूरग्रस्त भागांचा गिरीश महाजन यांचा दौरा; पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी वैज्ञानिक अभ्यास होणार

पालघर : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी जव्हार, मनोर तसेच जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर झालेल्या परिणामाचाही त्यांनी आढावा घेतला. पालघर–जव्हार मार्गावरील विक्रमगड तालुक्यातील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा करत पालघर जिल्ह्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी नामांकित संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक अभ्यास केला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्यात येणार असून, त्याच्या अहवालाच्या आधारे शासन दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविणार आहे.

यानंतर मंत्री महाजन यांनी माहीम–केळवा (झांझरोली) धरणाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या मातीभरावावरील अश्मपटल (पिचिंग) काही ठिकाणी ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दौऱ्यात त्यांनी मात्रेवाडी तसेच केळवा–माहीम धरणालगतच्या गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन वस्त्यांना जोडणारा पूल उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्य शासन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *