ठाणे(Thane) : शिवसेनेचा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नसून संघटनेच्या सातत्यपूर्ण वाढीचा, संघर्षाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा पुरावा असल्याचे मत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा गौरव करत संघटनेच्या वाढत्या प्रभावावर विश्वास व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर उभी राहिलेली शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तत्त्वांचा वारसा जपत संघटना राज्यभर अधिक वेगाने विस्तारत असल्याचा दावाही त्यांनी केला.
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची शिवसेनेची परंपरा कायम असल्याचे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांचे समर्पण, जनतेचा वाढता विश्वास आणि विकासाभिमुख भूमिका हीच संघटनेची खरी ताकद असल्याचे अधोरेखित केले.
“गावागावांत शिवसेनेचा विस्तार होत आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे संघटना दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. हा वर्धापन दिन केवळ भूतकाळातील यशाचा गौरव करणारा नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठीच्या निर्धारालाही बळ देणारा आहे,” असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेना अधिक संघटित आणि मजबूत होत असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
