Nagpur-नागपुरात १०,००० टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचे भूमिपूजन; संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना

नागपूर(nagpur) : नागपूर येथील यंत्रा इंडिया लिमिटेड (YIL) मध्ये १०,००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर भर देत भविष्यातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाने आपल्या सुरक्षाविषयक गरजांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत कोणत्याही देशाने संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानासाठी इतरांवर अवलंबून राहणे योग्य नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गरजा देशांतर्गत पातळीवर पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून भारत या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागपूरमधील हा प्रकल्प संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अत्याधुनिक प्रेसच्या माध्यमातून मोठ्या आकाराचे आणि उच्च दर्जाचे अॅल्युमिनियम मिश्रधातूचे घटक देशातच तयार करता येणार आहेत. त्यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना मिळण्याबरोबरच आयातीवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या मते, हा प्रकल्प देशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारे घटक लष्करी उपकरणे, क्षेपणास्त्रे, विमाननिर्मिती आणि इतर संरक्षण प्रकल्पांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण उत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, यंत्रा इंडिया लिमिटेडचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देशाच्या संरक्षण क्षेत्राला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *