मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे काम नाही. पक्षात काही सुधारणात्मक पावले उचलण्याची गरज आहे,” असे स्पष्ट मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.
पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल आणि नेतृत्व अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे पटेल यांनी सूचित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानाकडे पक्षाच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासमोरही नवे आव्हान उभे राहिले आहे. पक्षाध्यक्षपदाच्या नियुक्तीला विरोध दर्शवत पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित नोटिशीत पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांवर आक्षेप नोंदविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षाकडून याबाबत अधिकृत भूमिका काय मांडली जाते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
