Pune-वारीतील दिंड्यांना शासनाचा दिलासा! मानाच्या १० पालख्यांमधील १,४०० दिंड्यांसाठी २.८० कोटींचे अनुदान प्रत्येकी २० हजार रुपये थेट बँक खात्यात; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत निधी वितरणाला वेग

पुणे :
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी दिंड्यांसाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मानाच्या दिंड्यांना यंदाही प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे. या निर्णयानुसार मानाच्या १० पालख्यांतील एकूण १,४०० दिंड्यांसाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पात्र दिंड्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ या योजनेची अंमलबजावणी करत आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त तथा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मार्गदर्शनाखाली निधी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वारकरी दिंड्यांना कोणताही विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यरत केली आहे.

शासनाने २ जुलै २०२६ रोजी काढलेल्या निर्णयानुसार या अनुदानाला प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. वारीदरम्यान दिंड्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य, वाहतूक आणि इतर आवश्यक खर्चासाठी ही आर्थिक मदत उपयोगी ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली ही योजना यंदाही कायम ठेवण्यात आल्याने वारकरी संप्रदायात समाधान व्यक्त होत आहे.

यंदा एकूण १,४०० दिंड्यांना अनुदान देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत १,१९९ पात्र दिंड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १,००० दिंड्यांचे बँक तपशील प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्यांच्या खात्यांमध्ये थेट अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित १९९ दिंड्यांचे बँक तपशील प्राप्त होताच निधी तत्काळ वर्ग करण्यात येणार आहे.
याशिवाय, यंदाच्या वारीत नव्याने सहभागी झालेल्या ४१ दिंड्यांचाही अनुदान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अधिकाधिक वारकरी दिंड्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, ज्या दिंड्यांचे बँक खाते किंवा आवश्यक कागदपत्रे अद्याप प्रशासनाकडे जमा झालेली नाहीत, त्या दिंडी प्रमुखांनी ती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम कोणताही विलंब न होता थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

वारकरी परंपरेचे जतन आणि वारीतील दिंड्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदाही हजारो वारकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *