नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माहितीनुसार, रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थता जाणवू लागली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागल्याने प्रशासनाने तातडीने त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुदैवाने बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकारामागील नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, विषबाधेचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
