पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोकळ्या जागेत छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गांजासह रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १७ जून) रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील इंडक्शन हीट कंपनीच्या युनिट २ च्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.
याबाबत गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस कॉन्स्टेबल रामदास मेरगळ यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धोंडीबा ज्ञानदेव सारगे (वय २८, रा. खराबवाडी, मूळ- निलंगा, लातूर) याला अटक करण्यात आली असून समीर सरवर तडवी (वय २५, रा. खराबवाडी) व रोहन गायकवाड (रा. बीडवस्ती, चाकण) हे दोघे फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोंडीबा सारगे हा अवैध रित्या विक्री करण्यासाठी ३० हजार ९५० रुपये किमतीचा ६१९ ग्रॅम वजनाचा गांजा स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना पोलिसांना मिळून आला. पकडल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने हा गांजा फरार आरोपी समीर आणि रोहन यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
खराबवाडीत ३० हजारांच्या गांजासह एकाला अटक; दोघे फरार
